नवी दिल्ली : वृत्त संस्था – प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्याने आज सकाळी निधन झाले. त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटकाही आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले. रोहित सरदाना यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात दु:ख व्यक्त केला जात आहे. रोहित सरदाना हे 41 वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे.
हरियाणाच्या कुरुक्षेत्रात राहणाऱ्या रोहित सरदाना यांना बेस्ट अँकर NT Award आणि ENBA Award सह हिंदी पत्रकारितेतील प्रतिष्ठित गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारही मिळाला आहे. ते भारतातील सर्वात लोकप्रिय असे न्यूज अँकर होते. त्यांनी ईटीव्ही, सहारा समय, झी न्यूज त्यानंतर आज तकमध्ये काम केले. या चॅनेल्सच्या माध्यमातून त्यांचा आवाज घरोघरी पोहोचला होता. आजतकचा प्राईम टाईम शो दंगलच्या माध्यामातून त्यांनी एक विशेष ओळख निर्माण केली होती.
रोहित सरदाना यांनी आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते असो किंवा विरोधी पक्षांतील नेते दंगलमध्ये सर्वांची बोलती बंद करत असे. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स होते. JNU मधील देशविरोधी घोषणा, काश्मीर हुर्रियत नेत्यांचे पाकिस्तान फंड कनेक्शन यांसारख्या मुद्यांवरून त्यांनी एक अजेंडाच सेट केला होता.
निर्भिड अँकरसह चांगले बातमीदार
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदारांचा लेखाजोखा हा विशेष ठरला. ते निर्भिड अँकरसह उत्तम बातमीदारही होते. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक विषयांना हात घातला होता. त्यांच्या निधनाने आता दंगल सुन्न झाला आहे.