बहुजननामा ऑनलाईन– अभिनेता सुशांत सिंह राजपूत( sushant singh) प्रकरणाचे वृत्त देताना बनावट ट्विट प्रसारित करणे आज तक सह 3 चॅनल्सच्या चांगलेच अंगलट आले आहे. बनावट ट्विट प्रसारित केल्याने नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अॅथॉरिटी (एनबीएसए) ने ‘आज तक’ वृत्तवाहिनीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आज तक, झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज 24 या वाहिन्यांनी जाहीर माफी मागावी, असाही आदेश एनबीएसएचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी दिला आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे वृत्तांकन करताना या वृत्तवाहिन्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे एनबीएसएचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए.के. सिक्री यांनी म्हटले आहे. याप्रकरणी सौरव दास यांनी तक्रार केली होती. एनबीएसएच्या आदेशाची माहिती दास यांनी ट्विटरवरून दिली आहे.
व्हिडीओ तत्काळ काढून टाका
आपल्या आदेशात एनबीएसएने म्हटले की, कोणतीही गोष्ट प्रसारित करण्यापूर्वी त्याची खातरजमा करून घेणे आवश्यक असते. मात्र, सुशांतसिंह राजपूतशी संबंध जोडून काही ट्विट प्रसारित करताना आज तकने सत्यता तपासली नाही. या कार्यक्रमाचे यू-ट्यूब तसेच ‘आज तक’च्या वेबसाइटवर असलेले व्हिडीओ तत्काळ काढून टाकावेत, असे आदेशही न्यायालयाने दिले.
जाहीर माफी प्रसारित करा
न्यायालयाने आपल्या आदेशात आज तक, झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज 24 या तीन चॅनललला माफी मागण्यास सांगितले आहे. ही जाहीर माफी कधी प्रसारित करावी, त्याचा मजकूर, तारीख, वेळ एनबीएसए कळवणार आहे. सदरची जाहीर माफी प्रसारित केल्याचा पुरावा असलेली सीडी प्रसारणानंतर सात दिवसांच्या आत एनबीएसएला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मृतदेहाची दृश्य दाखवल्याने न्यूज नेशनला समज
अभिनेता सुशांत सिंह याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची दृश्य ‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. याबद्दल एनबीएसएने न्यूज नेशनला समज दिली. मात्र, या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, असे न्यूज नेशन वाहिनेने कळवल्याने एनबीएसएने या वाहिनीवर कारवाई केली नाही. सुशांतसिंहच्या मृतदेहाची क्लोजअप छायाचित्रे एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दाखविली नसल्याने एनबीएसएने एबीपी माझावर कारवाई केली नाही.