ठाणे: बहुजननामा ऑनलाईन – विवाहित असूनही पुन्हा एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणा-या एका तरुणास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीस हेमंत पटवर्धन यांनी सोमवारी (दि. 15) सुनावली आहे. तसेच 30 हजाराचा दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.
प्रविण सुरेश वाघेचा (31, रा. अंधेरी, मुंबई ) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, कळव्यातील मनिषानगर येथे राहणारी पिडित 31 वर्षीय घटस्फोटीत महिला आणि मुंबईच्या अंधेरीमध्ये राहणारा प्रविण या दोघांची एका विवाह जुळविणा-या संस्थेमध्ये ओळख झाली होती. त्याची घटस्फोटाची प्रक्रीया पूर्ण झाली नव्हती. तरीही त्याने विवाह झाल्याचे तिच्यापासून लपवून ठेवत तिच्याशी ओळख वाढविली. लग्नाचे अमिषाने कल्याणजवळील शहाड येथील एका हॉटेलमध्ये फिरण्याच्या निमित्ताने घेऊन गेला. त्याठिकाणी एका शीतपेयात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर तिचे विवस्त्र अवस्थेतील मोबाईलद्वारे चित्रणही करुन तिची फसवणूक केली. कालांतराने मात्र दोघे आंतरजातीय असल्याचे कारण दाखवित तिच्याशी कुटूंबियांच्या विरोधामुळे लग्नालाही त्याने नकार दिला. तिने अखेर याप्रकरणी 24 फेब्रुवारी 2013 रोजी कळवा पोलीसात प्रविणविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रविणला तत्कालीन पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर यांच्या पथकाने सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अटक केली. जमादार ज्ञानेश्वर ताजणे यांनी पैरवी अधिकारी म्हणून न्यायालयात याबाबतचे पुरावे उभे केले. यातील साक्षीदार आणि सबळ पुराव्यांच्या आधारे सरकारी वकील विजय मुंढे यांनी जोरदार बाजू मांडली. त्याच आधारे न्यायालयाने प्रविणला सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.