बहुजननामा ऑनलाईन : केरळमधील इडुक्की परिसरात एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. जिथे घनदाट जंगलातून जाणाऱ्या जीपमधून एका वर्षाची चिमुरडी रस्त्यावर पडली आणि अश्यात तिने आई -वडील गाढ झोपले होते. ती चिमुरडी रांगत जवळच्या चेक पोस्ट वर पोहोचली असता, तेथील वन अधिकाऱ्यांची नजर तिच्यावर पडली. त्यानंतर तिला तिच्या आई- वडिलांकडे सुखरूप पोहचविण्यात आले.
सोशल मीडियावर या घटनेचा विडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमाला मध्ये सोमवारी आई – वडील आणि चिमुरडी जीपमधून परत येत होते. दोघेही जीपच्या मागच्या सीटवर बसले होते. मुलगी आईच्या जवळच होती. आई- वडिलांचा डोळा लागला आणि मुलगी गाडीतून बाहेर रस्त्यावर पडली. किती तरी लांब अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि, त्यांची मुलगी त्यांच्या जवळ नाही. चेक पोस्टवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती चिमुरडी गाडीतून पडल्याचा आणि रांगत असताना दिसत आहे.
चेक पोस्टवरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना चेक पोस्ट जवळ एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. ज्या रस्त्यावर मुलगी सापडली त्या रस्त्यावर हत्तीसोबतच अनेक प्राणी ये-जा करत असतात. दरम्यान, जीपमधून पडल्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर जखम झाल्याने तिच्यावर उपचार करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि तिचे आई- वडील कांबलीकंदम येथील रहिवासी आहेत. तामिळनाडू येथील पलानी मंदिर येथून दर्शन घेतल्यांनतर ते घरी परतत असताना हा प्रकार घडला. उपनिरीक्षक संतोष के.एस.यांनी सांगितले, मुलीच्या पडल्याची माहिती पालकांना मिळाली असता त्यांनी वेलाथुवाल पोलिस ठाण्यात तक्रार दिली, पण तोपर्यंत आम्ही सर्व पोलिस ठाण्यांना त्या मुलीबद्दल कळविले होते. सर्व उपचार पूर्ण झाल्यानंतर मुलीला रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.