मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणात वाझे यांची कसून चौकशी केली जात आहे. तत्पूर्वी वाझे यांची तब्येत खालावल्याने त्यांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी हलवण्यात आले होते. यावेळी मेडिकल रिपोर्टमध्ये वाझेंना मधुमेह असल्याचे उघड झाले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना पुन्हा उपचारानंतर NIA कार्यालयात नेण्यात आले. अटक केलेल्या वाझेंना विशेष न्यायालयाने 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. NIA च्या या कारवाईनंतर आता सचिन वाझेचे निलंबन केले आहे. वाझेंना पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. अंबानींच्या घराजवळ कार नेऊन ठेवण्यामागील उद्देश काय होता? भीती दाखवून त्यांना काय साध्य करायचे होते, याचा तपास सुरू आहे. केवळ स्वतःच्या हिमतीवर वाझे इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ते कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेतली जात आहे. याचदरम्यान वाझेंच्या विरोधात काही भक्कम पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. वाझे वापरत असलेली गाडी 24 फेब्रुवारी अन् 13 मार्चला मुंबईतल्या पोलीस मुख्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे. हे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागले आहेत. वाझे यांच्याकडे असलेली इनोव्हा कार 24 मार्चला ठाण्यात गेली. याच दिवशी कारची नंबर प्लेट बदलल्याचा संशय एनआयएला आहे.