सुलतानपूर : वृत्तसंस्था – एका आठवी पास डॉक्टरने गर्भवती महिलेचे ऑपरेशन केल्याने संबंधित महिलेसह बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपुर येथे ही घटना घडली आहे. पीडित कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर चौकशीत रुग्णालयाचे काळंबेर समोर आले आहे. पोलिसांनी रुग्णालयाची चौकशी केली तेंव्हा रुग्णालयातील डॉक्टर आठवी, तर संचालक 12 वी पास असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याप्रकरणी पिडित कुटुंबीयांनी रुग्णालयाचे संचालक, डॉक्टर आणि इतर सहकाऱ्यांविरोधात बाल्दीराय पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आठवी पास असलेला कथित डॉ. राजेंद्र प्रसाद शुक्ला, 12 वी पास असलेला हॉस्पिटलचा संचालक राजेश सहनी अन्य एका 5 पास असलेल्या कर्मचा-याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानपूर जवळील मल्लानच्या पुरवा गावची पूनम नावाची महिला गर्भवती होती. मंगळवारी रात्री कुटुंबियांनी तिला अरवल येथील मॉं शारदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी पूनमवर ऑपरेशन केल होते. पण यावेळी तिला रक्तस्त्राव झाल्यामुळे या दोघांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी दोघांनाही उपचारांसाठी लखनऊला पाठवले. पण उपचारासाठी जाताना वाटेतच दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पिडित कुटुबीयांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉंं शारदा हॉस्पिटलचे संचालक राजेश सहनी 12 वी पास आहेत. तर रुग्णालयातील कथित डॉक्टर राजेंद्र प्रसाद शुक्ला केवळ 8 वी पास आहे. तर त्याचा सहकारी केवळ 5 वीपर्यंत शिकला आहे. अर्धवट शिकलेेले हे तिघेही रुग्णालय टाकून लोकांच्या जीवाशी खेळत होते. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.