पुणे : बहुजननामा ऑनलाईन – खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या स्वागताला चक्क पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या एक कर्मचारी आणि चाहत्यांनी गर्दी करून तुफान राडा घातल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी भागात घडली. पण, अचानक आलेल्या पोलिसांना पाहून एकच धावपळ उडाली. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून काही जणांना पकडले. त्यात पोलीस कर्मचारी देखील असल्याचे समोर आले. 8 जणांना अटक केली आहे. तर इतर पसार झाले आहेत. त्यांच्या वाहनात पिस्तुल देखील मिळले आहे.
याप्रकरणी शरीफ बबन मुलाणी (वय 36, भोसरी) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यासोबत आझाद शेखलाल मुलाणी (वय 30, चिखली), आदेश दिलीप ओंकडे (वय 21), मुबारक बबन मुलाणी (वय 38), संदीप किसन गरुड (वय 40), हुसेन जाफर मुलाणी (वय 43), सिराज राजू मुलाणी (22) आणि विनोद नारायण माने (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर समीर यासिन मुलाणी आणि जमीर यासीन मुलाणी व इतर फरार झाले आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफ मुलाणी हा पिंपरी-चिंचवड पोलीस दलात कर्तव्यास आहे. तो गुन्हे शाखेत दरोडा प्रतिबंधक शाखेत नेमणुकीस आहे. दरम्यान यातील आरोपी 2017 मध्ये समीर आणि जमीर या दोघा भावांनी खून केला होता. या गुन्ह्यात ते येरवडा कारागृहात होते. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅरोलवर सोडण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवारी या दोघांना जामीन मिळाला होता. त्यावेळी कर्मचारी शरीफ आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना घेऊन जाताना मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अनेकजण दुचाकी तर काहीजण कारमधून आले होते.
दरम्यान फुलेनगर दत्तमंदिरासमोर रस्त्यावर मोठा गोंधळ सुरू असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अरुण आव्हाड, कर्मचारी सावंत यांच्यासह पथकाने या ठिकणी पोलीस गेले असता त्यांना पाहून हे टोळके पळून जाऊन लागले. मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने आणखी पोलीसांचा ताफा मागवला आणि त्यांना दोन्ही बाजूनी घेरण्यात आले. मात्र यावेळी देखील जामिनावर सुटलेले दोघे आणि काहीजण पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी 8 जणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. तर कारची तपासणी केली असता त्यात पिस्तुल आणि काही घटक शस्त्र मिळाले. यावेळी पकडण्यात आलेल्या 8 जणांनामध्ये पोलीस देखील असल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
दरम्यान गुन्हेगारांची रॅली आणि त्यांचे स्वागत करण्यास पोलिसच चाहत्यांसोबत असल्याने पोलीस दलात खळबळ माजली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सर्व प्रकार घडल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांनव्ये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.