नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नववी पास बहाद्दराने लष्करात मेजर असल्याचे खोट सांगून आणि लग्नाच अमिष दाखवून तब्बल 17 कुटुंबीयांना 6 कोटीला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. हैद्राबादमध्ये ही फसवणुकीचे घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीसांनी 42 वर्षीय भामट्याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून तीन नकली पिस्तूल, सैन्य दलाची वर्दी आणि सैन्याचे बनावट ओळखपत्र हस्तगत केले आहे. तसेच कार आणि 85 हजार रुपयांची रोखड देखील ताब्यात घेतली आहे.
मधुवथ श्रीनु नायक उर्फ श्रीनिवास चौहान असे या भामट्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील लमपल्ली गावाचा हा रहिवासी आहे. तो फक्त नववी पास असून त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याचे खोटे सर्टिफिकेट तयार करून घेतले होते.
सैन्य दलात अधिकारी असल्याचा दावा करत त्याने तब्बल 17 कुटुंबीयांची फसवणुक केली. त्या कुटुंबाकडून त्याने कोट्यवधी रुपये उकळल्याचे समोर आले आहे. मॅरेज ब्युरो अथवा ओळखीच्या लोकांच्या मदतीने तो लग्न करणारी मुलगी असलेले कुटुंब शोधायचा. त्यांना आपली खोटी माहिती देऊन आपल्या जाळ्यात अडकवत असे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आतापर्यंत साडे सहा कोटी रुपये लुटल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. त्याची पत्नी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात राहाते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.