Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

acb-police

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, एका सहायक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला 1 लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सापळा कारवाईत वरिष्ठांचा सहभाग आहे का याचा तपास करणे बाकी असल्याचे आणि इतर कारणे सांगत पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद दौलत चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल प्रभाकर कदम व त्यांचे कर्मचारी महेश विनायक दौंडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे, सापळा कारवाईत वरिष्ठांचा सहभाग आहे का, याबाबत तपास करायचा आहे. तसेच यामध्ये आणखी कोणी साथीदार आहे का, याचा तपास करायचा आहे. आरोपींच्या आवाजाचे नमुने तपासकामी घेण्याचे बाकी आहे, गुन्ह्यातील निष्पन्न साक्षीदारांचे जबाब नोंदवणे, गुन्ह्याचा अधिक सखोल तपास करणे, या गुन्ह्यात तक्रारदार याच्या मामावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या छायांकित प्रती, या गुन्ह्याचे सबळ पुरावे हस्तगत करणे बाकी आहे, या गुन्ह्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने तपास करण्यास वेळ मिळालेला नाही, आरोपींच्या कार्यालयातून हजेरीपट व इतर माहिती पुरावे घेणे बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?
तक्रारदार यांच्या मामावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, या प्रकरणात अटक देखील झाली आहे. त्यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. यासाठी गुन्ह्याचा तपासी अंमलदार यांचे कोर्टात म्हणणे सादर करण्यासाठी 5 लाखांची मागणी केली होती. त्यापैकी अडीच लाख रुपये आधीच देण्यात आले आहेत. मात्र, कोर्टाने तक्रारदार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर तक्रारदार यांनी सेशन कोर्टात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला. त्यावेळी कोर्टात पैसे देण्यासाठी पुन्हा उर्वरित अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यावेळी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने शनिवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 1 लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. सरकार तर्फे ॲड.राजेश कावेडीया यांनी तर आरोपी तर्फे ॲड.प्रताप परदेशी यांनी बाजू मांडली, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.