मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या उपराजधानीत एकाच दिवशी तीन खून झाल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. खून झालेल्या व्यक्तींमध्ये प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला यांचा समावेश आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केडीके कॉलेजजवळ बुधवारी २१ ऑगस्ट रात्री सैयद इम्रान सय्यद नियाज नामक तरुणाची हत्या करण्यात आली. दुसरी घटना सदर भागातील गोंडवाना चौकात घडली. प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला (वय-५०) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर तिसरा खून दिघोरी परिसरातील सेनापतीनगरात झाला आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी विकी विजय दहाट (वय-३२) या तरुणाची हत्या केली आहे.
आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी भोसकले…
राजेंद्रनगर चौकात खरेदी केलेले आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी एका भाजी विक्रेत्यावर चाकूने वार केले. भाजी विक्रेत्याचा सहकारी सैयद इमरान सय्यद नियाज हा बाजूला असलेल्या पानटपरीवर उभा होता. इमरान मदतीसाठी धावल्यानंतर त्या गुंडांनी त्याचा देखील पोटात चाकू खूपसुन वार केला. त्यावेळी इमरान खाली रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मारेकरी तिथून पसार झाले. परिसरातील नागरिकांनी इमरानला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.