हरियाणा : वृत्तसंस्था – हरियाणातील गुडगावमधील मेवाट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. औषधं आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या युवकाची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. त्या युवकाच्या चुलत भावांनाही जमावाने बेदम मारलं आहे. आसिफ खान (वय, २५) असे हत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर असिफच्या कुटूंबीयाने जमावाविरोधात झुंडबळीचा आरोप केला आहे. या घटनेवरून पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले आहेत.
याबाबत अधिक माहितीनुसार, असिफ खान हा जीम ट्रेनर आहे. तो आपल्या चुलत बंधूंसोबत बाहेरून घरी येत असताना, त्यावेळी जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये आसिफचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हत्या केल्यानंतर आसिफचा मृतदेह सोहना गावात फेकून देण्यात आला होता. या घटना प्रकरणानंतर तेथील परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून तेथील स्थानिकांनी रस्ता अडवत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. हल्ल्यादरम्यान आसिफला जमावाने काठ्या, रॉड आणि दगडांनी मारहाण करत हत्या केल्याचा आरोप असिफच्या कुटूंबीयाने केलाय.
दरम्यान, असिफचा मृतदेह बघितल्यानंतर तेथील गावकऱ्यांचा संताप झाला आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी गुडगाव-अलवर रोड अडवत आंदोलन केलं. पोलीस घटनास्थळी पोहचली असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लोकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या घटनेवरून गुन्हा दाखल केला असून ६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या दरम्यान हल्ल्यामध्ये १२ लोक सहभागी असल्याचा आरोप असिफच्या कुटुंबीयांनी केलाय.