कोरेगाव भीमा प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांची चौकशी होणार ?
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन करून त्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. राज्य सरकार याप्रकरणी पावले उचलत असतानाच केंद्र सरकारने अचानक या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्याने अनेक प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. आता कोरेगाव-भीमा प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी चौकशी आयोगाकडे केली आहे.
डॉ. संजय लाखे पाटील यांनी चौकशी आयोगाकडे केलेल्या या मागणीमुळे भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्या समोरील अडचणीत वाढ होऊ शकते. फडणवीस यांची याप्रकरणी चौकशी झाल्यास भाजपासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. डॉ. लाखे यांनी म्हटले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी करण्यात यावी यासाठी त्यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे. अशी मागणी मी तपास आयोगाकडे केली आहे. फडणवीस यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात कारवाईसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.
यापूर्वी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे केली होती. या पत्रात पवार यांनी म्हटले होते की, कोरेगाव-भीमा प्रकरणात फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केला. माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. पोलिसांना हाताशी धरून घडविलेले ते एक षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचाच सगळा डाव होता. पोलिसांनी या प्रकरणात बहुतेक पुरावे तोडून-मोडून सादर केले, असे गंभीर आरोप पवार यांनी पत्रात केले होते. यावर राज्य सरकार पावले उचलत असतानच केंद्र सरकारने अचानक या प्रकरणाचा तपास अचानक एनआयएकडे दिला. यानंतर एनआयएचे एक पथक सोमवारीच पुण्यात दाखल झाले होते. या गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे ताब्यात घेण्याबाबत पुणे पोलिसांशी चर्चाही या पथकाने केली. एनआयएच्या अधिकार्यांनी यासंदर्भातील एक पत्र पुणे पोलिसांना दिले आहे.
Visit : bahujannama.com
Comments are closed.