मुंबई ः बहुजननामा ऑनलाईन – एका 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गेल्या वर्षी जुलैमध्ये घडली होती.
गणेशपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना गेल्या वर्षी जुलैमध्ये घडली होती. पीडित मुलगी दुकानामधून किराणा सामान खरेदी करून घराकडे परतत असताना वाटेत हा प्रकार घडला होता. मात्र, पीडितेने रविवारी (दि. 14) घरच्यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी एका सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी एकाने गावाजवळील एका जुन्या बंगल्यात जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या मुलासह इतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. ही गोष्ट कोणालाही सांगितल्यास आम्ही तुझ्या वडिलांना जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी तिला दिली होती. यानंतर काही दिवसांनी त्यातील दोघांनी तिला पुन्हा बंगल्यात घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला.
रविवारी मुलीच्या वडिलांनी एका आरोपीला आपल्या मुलीकडे पाहून अश्लील वर्तन करताना पाहिले आणि यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी एका सामाजिक संस्थेकडे संपर्क साधला. यानंतर मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिने या सर्व घटनेबद्दलची माहिती दिली. यानंतर पीडितेला पोलीस ठाण्यात घेऊन जात चारही आरोपींवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याचे एका पोलीस अधिका-याने सांगितले आहे.