बहुजननामा ऑनलाइन टीम – विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेने ६ मीटर रुंदीचे किमान ८० कि.मी. लांबीचे ३३५ रस्ते ९ मीटर रुंदीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हरकती आणि सूचना मागविल्या असून आतापर्यंत एक हजारहून अधिक हरकती सूचना आल्या असून १ फेब्रुवारीपासून त्यावर सुनावणी होणार आहे.
महापालिकेने ३० डिसेंबरला ३३५ रस्त्यांची ९ मी. रुंद करण्याबाबत हरकती सूचना मागविल्या होत्या. हरकती व सूचना मागविण्याची मुदत आज संपली असून उद्यापर्यंत ऑनलाईन येणार्या हरकती व सूचना नोंदविण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. दरम्यान, ३३५ रस्त्यांमध्ये बहुतांश रस्ते हे डेक्कन जिमखाना परिसर तसेच सहकारनगर परिसरातील आहेत. या दोन्ही परिसरात अधिकतर संख्येने जुन्या टी.पी.स्किम असल्याने बहुतांश ६ मी. रुंद रस्त्याच्या कडेला बैठे बंगले आणि चाळी आहेत. यामध्ये भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता परिसराचा सर्वाधीक समावेश आहे. यामुळे या दोन भागातून सर्वाधीक नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत. तर उर्वरीत भागातून हरकती नोंदविताना काहींनी या निर्ययाचे स्वागतही केले आहे.
रस्ता रुंदीकरणाला विरोध दर्शविताना अनेक नागरिकांनी त्यांच्या बंगले व घरांच्या सिमाभिंती तोडाव्या लागतील. रस्ता रुंदी झाल्यास घराचा अथवा बंगल्याचा दरवाजा रस्त्यावरच उघडेल, जे धोकादायक आहे. रस्ता रुंद झाल्यास बेकायदा पार्किंग आणि छोट्या व्यावसायीकांचे अतिक्रमण होईल. रस्त्याच्या कडेला अनेकवर्ष जुनी झाडे आहेत, ती तोडावी लागतील. पाईपलाईन व ड्रेनेजलाईनसह वीजतारांचे जाळे आहे ते रस्त्याच्या मधोमध आल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान होईल, अशी भिती व्यक्त केली आहे. काहीजणांनी तर हे रस्ते रुंद करण्यासाठी महापालिका कधीही बुलडोझर घेउन आमच्या मिळकती पाडून टाकतील, अशीही भिती व्यक्त केल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, ६ मी. चे रस्ते ९ मी. रुंद करताना अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटर जागा सोडावी लागणार आहे. नवीन बांधकाम परवानगी घ्यायला आल्यानंतर फारतर दीड मीटर सोडून बांधकाम करावे लागणार आहे. बहुतांश रस्त्यावर जुने बंगले, चाळी अथवा छोट्या इमारती आहेत. त्यांचे पुनर्वसन करताना एफएसआयसोबतच टीडीआरही वापराला परवानगी मिळणार आहे. ज्या भागात टीओडी झोन आहे, त्याठिकाणी प्रिमियम एफएसआय वापरणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांची भिती अनाठायी आहे. १ फेब्रुवारीपासून या हरकतींवर सुनावणी होणार आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
शहरात सुमारे सोळाशेहून अधिक रस्ते ६ मी. रुंदीचे आहेत. विकास नियमावलीमध्ये ६ मी. रुंद रस्त्यांवर टीडीआर वापराता येत नसल्याने या रस्त्यांवरील पुनर्विकास करण्यास अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील ६ मी. रुंद रस्ते ९ मी. पर्यंत रुंद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या.