पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. कोरोनाशी लढा देताना शहरातील आरोग्य विभागाला तब्बल 10 कोटींचा बूस्टर डोस दिला आहे. याशिवाय शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. मात्र, कोरोना विरोधात लढण्यासाठी केलेली तरतूद पुरेशी आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोरोनामुळे उत्पन्नात घट झालेली असताना देखील स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2021-22 चे 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आरोग्य विषय सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याकडे जास्त भर दिला आहे.
महापालिकेत अंदाजपत्रक सादर करण्यात आले त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले की, कोरोनासाठीच्या पायाभूत सुविधा आत्ता उपलब्ध आहेत. जर पुन्हा आवश्यकता भासली तर त्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. यासाठी जर वेळ पडली तर आवश्यकता भासेल तशी रक्कम खर्च करण्यात येईल.
शहरातील कोरोना काळातील तपशील (24 फेब्रुवारी 2021 पर्यंत)
कोविड केअर सेंटर – 30
उपलब्ध बेड्स – 10,500
कोविड हेल्थ सेंटर, हॉस्पिटलमधील बेड – 7,466
आयसीयू बेड – 1055
व्हेंटिलेटर बेड – 521
एकूण उपलब्ध बेड – 18000
सर्वेक्षण केलेले कुटुंब – 13,21,628
गंभीर आजार, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला सर्वेक्षण – 4,02,343
कोविड सेंटर व स्वॅब सेंटर – 17
रुग्णवाहिका – 30
माझे कुटुंब माझी जबाबदारी तपासणी – 32,05,537
कोरोना प्रादुर्भाव – 1,99,696
बरे झालेले रुग्ण – 1,91,300
कोरोनामुळे झालेले मृत्यू – 4837
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची पूर्वतयारी
एका दिवशी संभाव्य कमाल रुग्ण – 19,560
होम आयसोलेशन – 7,824
कोविड केअर सेंटरमध्ये 8,802 बेड्स (उपलब्ध 10,000)
ऑक्सिजन आवश्यक बेड्स – 2934 (उपलब्ध 5050)
आयसीयू – 587 बेड्स (उपलब्ध 1055)
साधे ऑक्सिजन आवश्यक बेड्स – 2347 (उपलब्ध 3995)
आयसीयू व व्हेंटिलेटर आवश्यक बेड्स – 294 (उपलब्ध 534)
आयसीयू नसलेले व्हेंटिलेटर आवश्यक – 293 (उपलब्ध 521)
स्वॅब सेंटर – 18
प्रयोगशाळा – 19 ( 3 शासकीय 16 खासगी)
नमुना तपासणी क्षमता दररोज – 3115
तसेच उपचारासाठी लागणारी वैद्यकीय साधनसामग्री, औषधे आणि पुरेसे मनुष्यबळ तयार ठेवण्यात आले आहे. तसेच दोन कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स खरेदी करण्यात आल्या असून गरज पडल्यास आणखी दोन अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यामुळे कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सची संख्या चार होणार आहे.