यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – सध्या वातावरणात बदल झालेला पाहिला मिळत आहे. या बदलामुळे कधी कडक उन्ह तर कधी वादळी वाऱ्यासह पाऊस हे पाहिला मिळत आहे. या वादळाचा फटका एका दीड वर्षीय बाळाला बसला आणि दुर्दैवाने ते बाळ यामध्ये दगावले. आर्णी तालुक्यातील लोणी येथे काल (रविवारी) दुपारी आलेल्या वादळात घराच्या छतासह छताला बांधलेला पाळणा व त्यातील बाळ सुमारे 70 फूट हवेत उडाले. त्यात बाळ दगावले.
लोणी येथे राहणाऱ्या सुनील राऊत यांच्या दीड वर्षीय मुलाला पत्र्याच्या छताला बांधलेल्या पाळण्यात ठेवले होते. त्यामध्ये मंथन हे बाळ झोपी गेले होते. मात्र, दुपारी 12 च्या सुमारास एक मोठं वादळ आलं आणि राऊत यांच्या घराला विळखा घातला. हे वादळ इतके शक्तिशाली होते, की घराचे छप्पर व छप्परला बांधलेला पाळणा बाळासह तब्बल 70 फूटांवर आकाशात गिरक्या घेत उडाला. तब्बल 10 मिनिटांनी घराचे छप्पर एका दिशेने तर पाळण्यातील बाळ एका दिशेने फेकले गेले. या घटनेनंतर जेव्हा बाळ जमिनीवर पडले तेव्हा जखमी अवस्थेत बाळाला त्याच्या आई-वडिलांनी यवतमाळ येथे उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.
दरम्यान, या अनपेक्षित अशा दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील राऊत यांचे बाळ दगावलेच शिवाय ते बेघरही झाले आहेत. त्यामुळे आता राऊत कुटुंबियांनी प्रशासनाकडून नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी गावातून केली जात आहे.