सांगवी : बहुजननामा ऑनलाइन – सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई काटेपुरम चौक, सांगवी येथे आज (मंगळवारी) पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी मूळचे नेपाळ येथील आहेत.
भीमराज गंगाराम नाथ (वय 34, रा. साईरंग कॉम्प्लेक्स, काटेपुरम चौक, सांगवी. मूळ रा. टीकापूर कैलाली, ज्योतीनगर, जि. टिकापूर, नेपाळ), गिरी ठेबगे सिंग (वय 35, रा. श्री ज्वेलर्स जवळ, काटेपुरम चौक, सांगवी. मूळ रा. शिवडी, चौर पाटी मंगलसेन, नेपाळ), लक्ष्मण भत्ते टमाटा (वय 32), जनक रत्न ढकाल (वय 30, दोघे रा. कल्याण फाटा पनवेल रोड, मुंबई. मूळ रा. कुईने, तातापाने, ता. गुटू, जि. सुरवेत, नेपाळ), रमेश खडक आहुजा (वय 43, रा. रघुनाथ रोड, बांद्रा वेस्ट, मुंबई. मूळ रा. मुसोरिया, जि. गोटी कैलालीया अंशन, नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी नाथ हा तेथेच सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्यानेच हा कट रचला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथील काटेपुरम चौकातील श्री ज्वेलर्स या सराफी दुकानावर पाच जणांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे सर्वजण नर्मदा गार्डन लॉन्स जवळ असलेल्या दावल भंगार सेंटरच्या मागच्या बाजूला लपून बसल्याची माहिती बातमीदाराने दिली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांनी पहाटे सव्वा तीन वाजता त्या ठिकाणी सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी कटावण्या, सॅकबॅग, एक्सा ब्लेड कटर, नायलॉन दोरी, स्टीलचा चॉपर, लोखंडी कोयता, कापडी मास्क, कानटोपी असा एकूण १ हजार ४३० रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सर्वजण श्री ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस कर्मचारी संपत निकम, भिवसेन सांडभोर, धर्मराज आवटे, संजय गवारे, प्रविण दळे, फारुख मुल्ला, मोहम्मद गौस नदाफ, मयुर वाडकर, तुशार शेटे, चेतन मुंढे, नितीन बहिरट यांच्या पथकाने केली. पुढील तपास युनिट २चे सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.