मुंबई – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी झालेल्या ऐतिहासिक लढ्यात भरीव योगदान देणारे रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव शेजवळ यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा लढाऊ सेनानी हरपला आहे. अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत बाबुराव शेजवळ यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
दिवंगत बाबुराव शेजवळ यांनी अगदी तरुण वयातून आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने काम करणे सुरू केले होते. दलित पँथर या आक्रमक संघटनेतून त्यांनी काम केले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात बाबुराव शेजवळ यांनी पोलिसी लाठीमार झेलून तुरुंगवासही भोगला. दलित पँथरपासून रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेत ते तरुणांना लाजवतील अश्या उत्साहाने सक्रिय होते.
झोपडीवासियांच्या प्रश्नांसाठी ते सतत लढत होते. रिपब्लिकन ऐक्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. रिपब्लिकन ऐक्य घडविणे हीच बाबुराव शेजवळ यांना खरी आदरांजली ठरेल अशी शोकभावना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.