नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिवपद हे जाणीवपूर्वक अनुसूचित जातीच्या व्यक्तीला डावलून दुसऱ्याला दिल्याचा आरोप विद्यापीठातील मागासवर्गीय कर्मचारी संघटना, टीचर फोरम, आंबेडकर विद्यार्थी संघटनेसह दहा संघटनांनी केला. विद्यापीठ सातत्याने अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय करीत असल्याचा आरोप यावेळी करीत अनिल हिरेखण यांना प्रभारी कुलसचिवपद अनुसूचित जाती आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन कुलगुरू डॉ. काणे यांना देण्यात आले.
विद्यापीठात प्रभारी कुलसचिवपदाचा कार्यभार कुलगुरू डॉ. काणे यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याकडे सोपविला. त्यानंतर या निर्णयाविरोधात उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने कुलगुरूंना डॉ. हिरेखण यांना कार्यभार देण्याची शिफारस केली.
मात्र, डॉ. काणे यांनी ही शिफारस धुडकावून लावली. यावरून विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना, टीचर ऑर्गनायझेशन, आंबेडकर विद्यार्थी संघटना, फुले, शाहू, आंबेडकर अध्यापक परिषद, आंबेडकर टीचर सोसायटी, परिवर्तन पॅनल, एनएसयूआय, शैक्षणिक गुणवत्ता मंच, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदीं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली.यावेळी विद्यापीठात जातीयवादी भावनेतून निष्ठापूर्वक काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असल्याचा आरोप केला. या बदल्या तत्काळ रद्द करण्याची मागणी संघटनांतर्फे करण्यात आली.