मुंबई : सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 2017-18 वर्षाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे.
अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आदी विविध समाजातील लोकांसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्ते व संस्थांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात येतात. सन 2017-18 या वर्षाच्या पुरस्कारांसाठी संस्था व व्यक्तिंची निवड समितीने केली आहे.
सन 2017-18 या वर्षाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारासाठी भंडारा जिल्ह्यातील मीरा संतोष भट (रा. पुष्पानंद, विनोबा भावे नगर, तुमसर) यांची तर संस्थेचा पुरस्कार बीड जिल्ह्यातील जागर प्रतिष्ठान (पाडळसिंगी , बीड) या संस्थेला जाहीर झाला आहे.
सन 2017-18 या वर्षाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी विविध जिल्ह्यातील 61 व्यक्तिंची तर सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या संस्थांची नावे – जनसेवा फाउंडेशन, पुणे, आरोग्य प्रबोधिनी, गडचिरोली, इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, पंढरपूर, कोल्हापुरी लेदर चप्पल उत्पादक व विक्रेता संस्था, कोल्हापूर आणि परिवर्तन विद्याप्रसारक संस्था, धुळे.
निवड झालेल्या व्यक्ती व संस्थांना पुरस्काराचे वितरण एका भव्य कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती बडोले यांनी दिली आहे.