पुणे : बहुजननामा ऑनलाइन – बूथ स्तरावरील बूथप्रमुखांची मेहनत आणि त्यांनी बूथवर केलेले प्रत्यक्ष काम या जोरावर भाजपने निवडणुका जिंकल्या आहेत. बूथ प्रमुखांचे काम महत्वाचे आहे. ‘मिशन २०१९’ यशस्वी करण्यासाठी बूथ रचनांचे सक्षमीकरण करा, असे आवाहन प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी केले.
पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील बूथरचना प्रमुख, विस्तारक, शक्ती केंद्र प्रमुख, प्रचार प्रसिध्दी, सोशल मीडिया, शासकीय योजनांचा प्रसार या बाबींचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत सरोज पांडे बोलत होत्या.
प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणीक, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पांडे पुढे म्हणाल्या, ‘भाजपला बूथ रचनेमुळे मिळालेले यश लक्षात घेऊन आता काँग्रसचे नेतेही बूथची भाषा बोलू लागले आहेत. मिशन २०१९ यशस्वी करण्यासाठी मतदार यादीचे सूक्ष्म नियोजन करा. शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. सोशल मीडियावर योजनांचा प्रसार करा. कार्यकर्त्यांची मेहनत आणि जमिनीवरील काम पक्षाला निश्चित विजय मिळवून देईल.
’प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणीक यांनी आढावा घेतला. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक केले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वागत केले. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आभार मानले.