पंचकुला (हरियाणा) : वृत्तसंस्था-उलट सुलट गोष्टी करत किंवा नेहमी काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत कायम चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत हिला एका कुस्तीपटूचे चॅलेंज स्वीकारणे चांगलेच महागात पडले आहे. राखीला रेसलिंग रिंगमधून थेट रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रेसलिंगच्या बिग फाईटचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित केलेल्या स्पर्धेत विदेशी कुस्तीपटू रोबेलने फाईट जिंकल्यानंतर ‘कुण्या भारतीय महिलेत हिंमत असेल तर तिने माझ्याशी लढावे’, असे ओपन चॅलेंज दिले. तिचे हे चॅलेंज ऐकताच राखीने तिला प्रतिआव्हान देत ‘तुझ्यात दम असेल तर तू माझ्यासारखे नाचून दाखव’ असे सांगितले. त्यानंतर राखीने डान्स करण्यास सुरुवात केली. मात्र तिचा डान्स पाहत असताना अनेकांनी राखीला चीअरअप करत रोबेलला ठेंगा दाखवत चिडवले. हा राग मनात धरत रोबेलने राखीला हवेत उचलून जोरात जमीनीवर आपटले.
५ ते ८ मिनिटे राखी सावंत रिंगमध्ये वेदनेने कळवळत होती. सुरुवातीला प्रेक्षकांना आणि सीडब्लूई चॅम्पियशनपच्या कर्मचाऱ्यांना काही समजलेच नाही. राखीला दुखापत झाल्याचे समजल्यानंतर तिला जीरकपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून रोबेलला अचानक राग अनावर झाला आणि तिने राखीला उचलून खाली आपटले. मात्र आता राखीची प्रकृती ठीक असल्याचे’, आयोजक समितीचे सदस्य बलवान यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. सीडब्लूई चॅम्पियनशिप पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. द ग्रेट खलीसह अनेक प्रसिद्ध कुस्तीपटू उपस्थित होते. सीडब्लूई चॅम्पियनशिप पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. द ग्रेट खलीसह अनेक प्रसिद्ध कुस्तीपटू उपस्थित होते.