बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली पीएमपीची सेवा पूर्ववत झाली आहे. तथापि, आता पीएमपीच्या प्रवासी भाडे दरात आठ वर्षांनंतर बदल करण्यात येणार आहे. तसेच दैनंदिन पास स्वस्त आणि सुटसुटीत केले जाणार असून, यापुढे शहरात दिवसभर फिरण्यासाठी फक्त ४० रुपये मोजावे लागणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता पीएमपीची सेवा सहा महिन्यांपासून बंद होती. ती ३ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आली. मात्र, आता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भाडे आकारणीच्या दरात बदल केले जाणार आहेत. याबद्दलचा प्रस्ताव १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत समोर ठेवणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी दिली. पीएमपी प्रशासनाने याबाबत प्रवासी व स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती. आता पुणे व पिंपरी महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यास त्याची अंमलबजावणी होईल.
दरम्यान, यापूर्वी पीएमपीची शेवटची भाडेवाढ २०१२ साली झाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी पीएमपीचे भाडे ५, १०, १५, आणि २० रुपयांनी वाढवले होते.
नवीन सेवा
१. मिडी बस – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात मिडी बस धावतील. त्यासाठी ५ रुपये तिकीट
२. एक्सप्रेस बस सेवा – या बस विशिष्ट्य थांब्यावरच थांबतील. यासाठी वेगळा दर ठरवण्यात येईल. उदा. २२ थांब्यावरील बस फक्त ६ ते ७ थांब्यावरच थांबेल. यामुळे १ तासाचा प्रवास अर्ध्यातासावर येणार आहे.
३. लिमिटेड बस सेवा – विशिष्ट्य मार्गावर बस विनाथांबा धावतील. उदा. धायरी-स्वारगेट, कात्रज-स्वारगेट, हडपसर-स्वारगेट
असा असेल प्रस्ताव
१. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात मिडी बसमधून प्रवासासाठी ५ रुपये भाडे
२. विमानतळ सेवेसाठी अंतरानुसार ५०,१०० आणि १५० रुपये वाढ
३. ई-पेमेंट करणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी ५ टक्के सवलत
४. एसी ई बसमधून प्रवासासाठी ५ रुपये दरवाढ
५. रात्री १२ ते पहाटे ५ च्या प्रवासासाठी ५ रुपये दरवाढ
पासचे दर होतील स्वस्त
१. पुणे शहराच्या मध्यभागात एक दिवस प्रवासासाठी पास – २० रुपये
२. पुणे महापालिका हद्दीत एक दिवसाचा पास – ४० रुपये (मासिक पास ९०० रुपये)
३. पिंपरी-चिंचवड हद्दीसाठी एक दिवसाचा पास – ४० रुपये (मासिक पास ९०० रुपये)
४. पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी एका दिवसाचा पास – ५० रुपये (मासिक पास १२०० रुपये)
५. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यासाठी एक दिवसाचा पास – ७० रुपये (मासिक पास १५०० रुपये)