अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेच्या वतीने नगरच्या तिळवण तेली समाज ट्रस्टला उत्कृष्ट संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार अध्यक्ष मोहनराव देशमाने यांच्या हस्ते सचिव प्रभाकर देवकर व खजिनदार प्रसाद शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना सचिव प्रभाकर देवकर म्हणाले, तिळवण तेली समाज ट्रस्टच्या माध्यमातून समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गरजूंना साहित्याचे वाटप करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम, विद्यार्थ्यांना शालेय मदत, महिला बचत गटांचे संघटन, विविध तज्ञांची व्याख्याने आयोजित करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
समाजातील सर्वस्तरातील लोकांच्या उन्नत्तीसाठी ट्रस्ट काम करत आहे. त्यामुळेच आज राज्यस्तरावरील पुरस्काराने सन्मानित होत आहे. यात सर्वांचा मोठा वाटा आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल तिळवण तेली समाज ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष प्रकाश सैंदर, सचिव प्रभाकर देवकर, खजिनदार प्रसाद शिंदे, विश्वस्त सागर काळे, दत्तात्रय डोळसे, सचिन शेंदूरकर, मनोज क्षीरसागर, गोकुळ कोटकर, सुनंदा नागले, निता लोखंडे व सदस्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.