कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – बनावट जातीच्या दाखल्याच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पद मिळवणाऱ्या किरण राजेंद्र सोलगे (वय २५, रा. सोलगे मळा, इचलकरंजी) या तरूणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याबद्दल या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे ऑनलाईन एक तक्रार दाखल होती. यामध्ये तक्रारदाराने म्हटले होते की, किरण राजेंद्र सोलगे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१६/१७ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत २३ ऑक्टोबर २०१७ रोजी कसबा बावडा येथे झालेल्या शारीरिक चाचणीमध्ये डमी व्यक्तीला उभे केले होते, त्याची चौकशी व्हावी.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सानप यांनी किरण सोलगे याने जोडलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी केली. सोलगे याने उपनिरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक अशा दोन पदांसाठी उमेदवारी अर्ज भरले होते. एका प्रवेश अर्जामध्ये त्याने आपली जात मागासवर्गीय असल्याचा दाखला जोडला होता, तर दुसऱ्या अर्जासोबत हिंदू-धनगर अशी नमूद करून धनगर जातीचा दाखला जोडला होता. तो मूळ धनगर जातीचा असल्याची माहिती पुढे आली आहे.
अनुसूचित जातीचा दाखला वापरून त्याने उपनिरीक्षक पद प्राप्त केले होते. प्रशिक्षणासाठी त्याला पाठवले जाणार होते. त्यापूर्वीच त्याने बनावट दाखले जोडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक केली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार संशयित किरण सोलगे यास अटक करून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र सानप, सचिन पाटील, अनिल ढवळे, विलास किरोळकर, अनिल पास्ते, रमेश डोईफोडे, असिफ कलाईगार यांनी तपास केला.