नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – ओबीसीच्या यादीत काची, कची, कच्ची व कच्छी या सर्व जाती एकच आहेत. तसा अहवाल सादर करून शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी आगामी अधिवेशनात प्रश्न लावून धरावा अशी मागणी मेमन समाजाच्या वतीने आ. प्रदीप नाईक व आ. ख्वाजा बेग यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आ. प्रदीप नाईक, आ. ख्वाजा बेग यांनी हजेरी लावली होती. या वेळी मेमन जमातचे सचिव हाजी रऊफ टिक्की, झोनल सेक्रेटरी हाजी कादर दोसानी, शफी खाखरा, नगरसेवक यासीन नागाणी, इकबाल फाजलानी, इमरान अकबानी, कासीफ खाखरा यांनी जात प्रमाणपत्राचा विषय मांडला.
तांत्रिक त्रुटीमुळे मेमन समाजाच्या युवकांना जात प्रमाणपत्र काढण्यात अडचण येत आहे. २६ सप्टेंबर २००८ च्या शासननिर्णयात दुरुस्ती करून ‘कची’ जातीचा ओबीसीच्या यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली.राज्य शासनाच्या ओबीसीच्या यादीत अनुक्रमांक ८५ वर कची जातीचा उल्लेख आहे. पण राज्यात सर्वत्र काची, कच्ची, कच्छी या जाती असल्याने जात प्रमाणपत्र काढताना व शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक योजनांचा लाभ घेताना कची समाजाला अडचण येत आहे.उपसचिवांनी १८ ऑक्टोबर २०१२ रोजी शुद्धीपत्रक काढून ओबीसीच्या यादीतील क्रमांक ८५ मध्ये दुरुस्ती केली होती. पण जात वैधता प्रमाणपत्रासाठी शासन निर्णयाची मागणी करत असल्याने या समाजाची मोठी कुचंबना होत आहे.
त्यामुळे शासन निर्णय काढून कची जातीची ओबीसीच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी मेमन समाजाच्या वतीने आमदार प्रदीप नाईक व ख्वाजा बेग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रश्न आगामी अधिवेशनात उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधणार असल्याबाबत आमदारद्वयांनी आश्वासन दिले. या वेळी गटनेते चिराग शहा, मेघराज जाधव, प्रा. भगवानराव जोगदंड यांचीही उपस्थिती होती.