नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात हे अधिवेशन आयोजित करण्यात आल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
यावेळी मोर्चाचे राष्ट्रीय नेते प्रो. राजेश कुमार, सुभाष पारधी, अशोक मेंढे, ॲड. धर्मपाल मेश्राम, भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, चंदन गोस्वामी, अंबादास उईके, सतीश सिरसवान उपस्थित होते.अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. विनोद सोनकर यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनाला देशभरातून पाच हजार पदाधिकारी उपस्थित राहणार असून, आज दुपारी १२ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
अधिवेशनात केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत, भूपेंद्र यादव यांच्यासह भाजपाचे ४६ खासदार आणि १५० आमदार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले आहेत. अधिवेशनाचा समारोप रविवार, २० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता होईल आणि त्यानंतर दुपारी ३ वाजता कस्तूरचंद पार्क मैदानावर ‘विजयी संकल्प सभा- २०१९’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुधाकर कोहळे यांनी यावेळी दिली. या सभेला पाच लाखाहून अधिक कार्यकर्ते हजर राहणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
रविवार, २० जानेवारी रोजी कस्तूरचंद पार्क मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येणार असल्याचे आ. सुधाकर कोहळे यांनी सांगितले.