मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लग्नसराईच्या काळात तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. दिवाळीच्या दिवसात जवळपास 32 हजारांच्या आसपास गेलेल्या सोन्याचा दर आता जवळपास 1600 रुपयांनी कमी झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर घसरल्याने कधी शंभर, दीडशे, कधी पन्नास रुपये असे करीत करीत तब्बल 1600 रुपयांपर्यंत एकूण घसरण झाली आहे. 32 हजार 800 पर्यंत पोचलेल्या सोन्याचा दर (प्रतितोळा) आज जवळपास 31 हजारांवर आला आहे.
यंदा दुष्काळाचे सावट असले, तरी बाजारपेठेत सोने खरेदीस नागरिकांचा उत्साह अधिक होता. धनत्रयोदशीपासून तब्बल वीस दिवस सोन्याच्या बाजारपेठेत दरवाढ होती. दिवाळीनंतर आता लग्नसराईत लागणाऱ्या दागिन्यांची खरेदी होत आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांत पंधराशे ते सोळाशे रुपयांची टप्प्याटप्प्याने घसरण झाल्याने ग्राहकांचा सोने खरेदीकडील कल वाढू लागला आहे.
गेल्या महिन्याभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य वधारलं आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. 4 नोव्हेंबरला 1 डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 72.90 रुपये होतं. मात्र आता रुपयाची स्थिती सुधारली आहे. आज 70.47 रुपये इतकं आहे. रुपयाचं मूल्य वधारल्यानं सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी सध्या लोकांची झुंबड उडताना दिसत आहे. येत्या काही दिवसात सोन्याच्या किमतीत वाढ होणार असल्याची शक्यता असल्यानं अनेक जण गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत.
दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. त्यामुळे या काळात सोन्याचा दर जास्त असतो. या वर्षीदेखील नेमका असाच ट्रेंड पाहायला मिळाला. मात्र दिवाळी संपताच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.