मराठा जात प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार, तहसीलदारांना निवेदन

नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – मराठा समाजास शासनाने आरक्षण देऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरी मुखेड तालुक्यात मराठा समाज बांधवांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचे दाखले तहसील प्रशासनातर्फे मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, सेतू सुविधा केंद्रांवर सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असून जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे. महसूल प्रशासनाने तत्काळ मराठा प्रमाणपत्र निर्गमित करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा समाज बांधवांच्या एका शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिक आरक्षण जाहीर होउन दोन महिने झाले तरीही मुखेड तालुक्यात एकालाही तसे प्रमाणपत्र मिळते नाही. मराठा समाज बांधव सेतू केंद्रात संपूर्ण कागदपत्रे दाखल करुन प्रमाणपत्रासाठी रोज चकरा मारत आहेत. मात्र प्रमाणपत्र मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बाजार समितीचे उपसभापती डॉ. व्यंकट भोसले सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली माधवराव कारभारी, व्यंकटराव ढगे, नामदेवराव जाधव, संदीप शेळके, पद्माकर जाधव, अरुणा अशोक शिंदे आदींनी तहसीलदार अतुल जटाळे यांना निवेदन दिले. आरक्षणासाठी मराठा समाजाने दीर्घकाळ लढा दिला. त्यानंतर आरक्षण प्राप्त झाले. आता प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाने या प्रकरणी तोडगा काढून लगेच प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा डॉ. सुभेदार यांनी या वेळी दिला.
Comments are closed.