नवी दिल्ली :वृत्त संस्था – लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर टिपण्णी केली आहे. शिक्षण आणि नोकरीत कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.फक्त आरक्षणामुळे देशाचे भले होणार नाही. देशाच्या सामाजिक रचनेत आणि मागासवर्गातील कुटुंबांच्या स्थितीत बदल घडवण्यासाठी आरक्षण पुरेसे नाही, असे मत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले आहे. रांचीमध्ये सुरू असलेल्या चार दिवसीय लोकमंथन समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं होतं, की आरक्षण फक्त १० वर्षांकरिता आवश्यक आहे. आरक्षणानं देशाचं कल्याण होणार आहे काय ? असा प्रश्नही सुमित्रा महाजन यांनी उपस्थित केला आहे. तसेच देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या मार्गानं चालणं गरजेचं आहे.
जोपर्यंत तुमच्यात देशाबद्दलची भक्ती वाढणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. संसद आरक्षण वाढवत चाललं आहे. प्रत्येक वेळी १० वर्षांसाठी आरक्षण वाढवलं जातंय. एकदा तर आरक्षणाची मुदत २० वर्षांसाठी वाढवण्यात आली होती, असं कधीपर्यंत चालणार आहे. या आरक्षणाची मुदत वाढवण्यामागे काय विचार आहे. आमच्यासाठी सर्व धर्म समान आहेत. आज देशाला आणि समाजाला तोडणारी ताकद सक्रिय आहे. आदिवासींच धर्म परिवर्तन केलं गेलं. परंतु आमच्या सरकारनं धर्म परिवर्तनविरोधी कायदा केला. तसेच आरक्षणासंदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येऊन विचारविनिमय करण्याची गरज आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागले.
गोव्यात दाबोळी विमानतळावर २२ लाख विदेशी चलनासह चौघांना अटक
या मुद्द्यांवर राजकारण करता येणार नाही, कारण कायद्याचं सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी संसदेत सर्वच पक्ष मतदान करत असतात. तसेच यावेळी महाजन यांनी व्यंकय्या नायडूंच्या भाषणाचाही उल्लेख केला. देशाचा विचार सर्वात पहिला यायला हवा, लोकांनी जन, गण, मन संदर्भात विचार करायला हवा, लोकांना देशाचा इतिहास आणि साहित्यासंदर्भात माहिती असायला हवी, असंही त्या म्हणाल्या आहेत.