ठग ऑफ महाराष्ट्र ! राज्य सरकारच्या फसवणुकीची पोस्टरबाजी
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- सरकारविरोधात मोर्चेबांधणी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक रविवारी मुंबईत सुरू झाली. मात्र या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ठग्स ऑफ हिंदुस्थान या चित्रपटाच्या धर्तीवर विरोधी पक्षांनी ठग ऑफ महाराष्ट्र असे नाव देऊन हे पोस्टर लावले आहे. आमीर खानच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र लावून त्याखाली ‘ठग ऑफ महाराष्ट्र’, ‘ठगबाजीची चार वर्षे’ असे बोचरे मथळे झळकवण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची छायाचित्रे लावलेल्या या पोस्टरमधून राज्य सरकारवर शालीतून जोडे मारण्यात आले आहे. तसेच सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या फसवणुकीचा पाढाच वाचण्यात आला आहे. त्यामध्ये जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी आणि बेरोजगारांशी ठगबाजी, अशे विविध मथळे देऊन सरकारचे अपयश बोर्डावर आले आहे.
सरकारच्या अपयशावर सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले असून त्यांनी या हिवाळी अधिवेशनाला वादळी बनवण्याचा बेत आखला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारे हे अधिवेशन महत्वपूर्ण मानले जाते आहे. या अधिवेशनात सरकारच्या अपयशाचा पाढा वाचून जनमत आपल्याकडे वळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहणार आहे. तसेच माध्यमांच्या चर्चेत राहण्याची रणनीती विरोधकांच्या वतीने आखण्यात येते आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू असलेल्या विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठकीला विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावीत, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्याताई चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत.
Comments are closed.