भंडारा : बहुजननामा ऑनलाइन – चिखला मॉइल आवारात आदिवासी युवकांवर अर्धनग्न करून सुरक्षारक्षकांनी धिंड काढल्याप्रकरणी आदिवासी कृती संघर्ष समितीने गोबरवाही येथे आंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनाची दखल घेत गोबरवाही पोलिसांनी चिखला मॉइलचे व्यवस्थापक आनंद चौकसे यांच्यासह सहा सुरक्षारक्षकांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कृती समितीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे न्याय मिळण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम साळी यांनी दोषींवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये बुधवारी गुन्हा नोंदविला आहे. १२ जानेवारीला व्यवस्थापक चौकसेसह सहा सुरक्षारक्षकांवर भादंवि कलम ३४१, ३५५, ३४ व ३२३ अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यात उपरोक्त दोषी जामिनावर बाहेर आहेत, हे विशेष. यावेळी गोंडवाना कृती समितीचे अशोक उईके, अनिल टेकाम, तोपलाल रहांगडाले, वसंत बिटलाये, लक्ष्मीकांत सलामे, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम साळी, तुमसरचे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, गोबरवाहीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर उपस्थित होते.